आजपर्यंत मी अगं बाई अरेच्चा, जत्रा यांसारखे अनेक विनोदी चित्रपट केले आणि आता”ऑन ड्युटी २४ तास”च्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं नाव आणि विषय अगदीच वेगळं आहे . मग नक्की आहे काय हा ”ऑन ड्युटी २४ तास”?
व्यावसायिक सिनेमांमध्ये गणला जाणारा गल्लाभरू सिनेमा नक्कीच आहे ! ठेका धरायला लावणा-या गाण्यांचा सिनेमाही नक्कीच आहे ! माझा आणि संतोष पवारचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे, त्यांच्यासाठीही हा सिनेमा आहे पण त्याहीपलीकडे हसता हसता अंतर्मुख करणारा हा सिनेमा असेल. आत्तापर्यंतच्या विनोदी सिनेमांच्या रांगेत ”ऑन ड्युटी २४ तास” आपलं एक वेगळं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो. मी हे एवढं छातीठोकपणे सांगू शकतोय, कारण पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या इतिहासात “महाराष्ट्र पोलीस” खात्यावर मी सिनेमा करतोय. आजपर्यंत मराठी किंवा हिंदी सिनेमांमधून दिसून येणारे पोलीस हे लाचखाऊ, क्लायमँक्स ला सर्व काही घडून गेल्यावर य़ेणारे नाहीतर एवढे प्रामाणिक की आपल्याला प्रश्न पडावा , एवढे प्रामाणिक पोलिस कधी असतात काय?
माझ्या सिनेमात पोलिसांकडे एक तुमच्या –आमच्यासारखा “माणूस” ह्या नजरेतून पाहिलं आहे. त्यांनाही आपल्यासारख्याच समस्या असतात, त्यांनाही त्यांच्या कुटूंबासोबत चार आनंदाचे क्षण घालवावेसे वाटतात. त्यांच्यातल्या “ माणसा”चं दर्शन ह्या सिनेमात नक्की बघायला मिळेल.